सातारा – दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक सातारा शाखेविरोधात फसवणुकीचे एकाचवेळी शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. या तिन्ही तक्रारी नलवडे कुटुंबाने दिल्या आहेत. पहिली तक्रार राहूल सुधाकर नलावडे (रा.वाढे ता. सातारा) यांनी दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक सातारा शाखेविरोधात दिली आहे.
या शाखेचे कर्ज विभाग प्रमुख रविंद्र संपत देशमुख, व्यवस्थापक पवार, चेअरमन चंद्रकांत गावडे, संचालक मंडळ, कर्ज व्यवस्थापक या संशयितांनी तक्रारदार यांचे आरटीजीएस करण्यासाठी घेतलेल्या सही केलेल्या कोर्या धनादेशाचा गैरवापर केला. खात्यावरील परस्पर १६ लाख रुपये वर्ग केले.
तसेच दुसर्या कोर्या धनादेशाचा गैरवापर करुन ६ लाख रक्कम कुलकर्णी नावाच्या व्यक्तीच्या नावे काढून अपहार केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहेे. दुसरी तक्रार ज्योती विशाल नलावडे (वय ३६, रा.सदरबझार) यांनी दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक सातारा शाखेचे तत्कालीन व्हाईस चेअरमन शैलेंद्र दत्तात्रय जाधव व काही संचालक यांच्याविरुध्द दिली आहे.
संशयितांनी तक्रारदार यांचे पती व दीर यांच्या खात्यातील ३३ लाख रुपये अपहार खात्याकडून वसूल न करता ती तक्रारदार यांच्याकडून स्वीकारलेली ८ लाख ४० हजार रुपये परत न करण्यास टाळाटाळ केली. तिसरी तक्रार विशाल नलावडे यांनी दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक सातारा शाखेचे रविंद्र देशमुख, चेअरमन गावडे, संचालक मंडळ यांच्याविरुध्द दिली आहे. तक्रारदार यांनी यातील संशयित रविंद्र देशमुख याच्याकडे विश्वासाने खात्यावर भरण्यासाठी ११ लाख रुपये दिले.
मात्र त्याने पैसे खात्यावर भरले नाहीत. संबंधित रक्कम इतर संशयितांनी माघारी देतो, असे आश्वासन दिले. मात्र त्यांनी ती रक्कम परत मिळवून दिली नाही, यामुळे संशयितांविरुध्द तक्रार दिली आहे. दरम्यान, या तिन्ही घटना सन २०१६ ते २०१८ या कालावधीत घडल्या आहेत.