नवी दिल्ली- रशियाच्या एका फार्मा कंपनीने करोनावरील लस विकसित केली आहे. त्यांच्या भारतातील चाचण्या आणि वितरण चेन्नई येथील डॉ. रेड्डी कंपनीकडून होणार आहे. त्याकरता चाचणी घेण्याची परवानगी डॉ. रेड्डीने मागितली होती. मात्र ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डिसिजीआयने हा प्रस्तान अमान्य केल्याची बातमी आहे.
रशियात तयार करण्यात आलेल्या स्फुटनिक 5 या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी भारतात करण्याची परवानगी मागण्यात आली होती. कंपनीने अगोदर भारतात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या घ्याव्यात असे डिसिजीआयने म्हटले आहे. या लशीच्या संदर्भात भारतातील डॉ. रेड्डी फार्मा कंपनीने रशियाच्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड अर्थात आरडीआयएफशी हातमिळवणी केली आहे.
करोनावर लस तयार केल्याचा दावा करणारा रशिया हा जगातला पहिला देश आहे. रशियाने आपल्या नागरिकांना लस देण्यास सुरूवातही केली आहे. तसेच रशियाच्या अन्य एका कंपनीच्या लशीबाबतही येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
याचा अर्थ करोना विरोधातील लशीच्या स्पर्धेत रशियाने आतापर्यंत बाजी मारली आहे. मात्र रशियाने ज्या वेगात ही लस तयार केली आहे, त्यावरून तिच्या सुरक्षिततेबाबत आणि उपयुक्ततेबाबतही काही तज्ञांनी शंका व्यक्त केली आहे. त्याच कारणामुळे मोठ्या प्रमाणात थेट तिसऱ्या टप्प्यातील चाचणीस भारत सरकारने नकार दिला आहे.
रशियातही स्फुटनिक 5 ची तिसरी टप्प्यातील चाचणी अद्याप सुरू असून चाळीस हजार स्वयंसेवकांना त्या अंतर्गत लस दिली जाणार आहे. भारतातही सध्या तीन लशींच्या चाचण्या सुरू आहेत.
त्यातील प्रमुख म्हणजे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या लशीची पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून घेतली जात आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील या चाचण्या आहेत. सीरम ऍस्ट्राजेनेका या फार्मा कंपनीसोबत या लशीचे उत्पादनही करणार आहे.
याशिवाय आयसीएमआरच्या सहकार्याने भारत बायोटेक ही कंपनी लस तयार करत आहे. तसेच झायडस कॅडिला कंपनीचेही लस विकसित करण्याचे काम सुरू आहे. या दोघांच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत.