पुणे – एकेकाळी गरिबांचे अन्न अशी ज्वारीच्या भाकरीची ओळख. पण, हळूहळू उत्पादन कमी होऊ लागले. त्यामुळे ज्वारीचे भावही वाढू लागले. यंदा तर उच्च प्रतीच्या ज्वारीने ७५ रुपये किलोचा भाव गाठला होता. अखेर पेरा काही प्रमाणात वाढला. त्यात निसर्गानेही साथ दिली. त्यामुळे ज्वारीचे भाव पुन्हा आवाक्यात येणे सुरू झाले आहे. गेल्या दहा दिवसांत ज्वारीचे भाव किलोमागे तब्बल १० ते १५ रुपयांनी घसरून ३८ ते ५८ रुपये किलोपर्यंत आले आहेत.
ज्वारीसाठी यंदा हंगाम पोषक ठरल्यामुळे बाजारात ज्वारीची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी, हॉटेल व्यावसायिकांसह गृहिणींनाही दिलासा मिळाला आहे. येथील मार्केट यार्ड भुसार बाजारात जामखेड, नगर, खर्डा, राशीन, सोलापूर येथून गावरान ज्वारी, तर राज्यातील पाचोरासह परराज्यातील नंदीयाल, सिंधनूर व जामनेर भागातून दुरी ज्वारी बाजारात दाखल होते. सद्यस्थितीत बाजारात दररोज दहा टनांच्या ५ ते ६ ट्रकमधून आवक होत आहे.
मागील महिन्यात हिच आवक अवघी २ ते ४ ट्रक होती. सध्या ज्वारीचा हंगाम सुरू झाल्याने मार्केट यार्डात आवक दुपटीने वाढली असून त्यातुलनेत मागणी कमी आहे. गावरान ज्वारीचे दाणे मोठे व चमकदार असतात. या ज्वारीतून जास्त पीठ निघते. या ज्वारीच्या भाकरी या नरम असतात. तर दुरी ज्वारीचे दाणे लहान व गावरानच्या दुलनेत कमी चमकदार असतात. यामध्ये पिठाचे प्रमाण कमी असते.
ज्वारी आणि प्रतिकिलो भाव (रुपयांत)
किरकोळ बाजार – जानेवारी – फेब्रुवारी
गावरान – ६८ ते ७०- ५६ ते ५८
गावरान नं. 2 – ५८ ते ६४ – ५० ते ४८
गावरान नं. 3- ५० ते ५५ – ४५ ते ४७
दुरी – ४५ ते ५० – ३८ ते ४०
चपातीपेक्षा भाकरी खाण्यास का पसंती ?
स्थूलपणा कमी करण्यासाठी ज्वारी, बाजरीच्या भाकरीचा आग्रह वाढता आहे. शिवाय मधुमेह किंवा अन्य आजार असणाऱ्यांना आहारात भाकरी खाण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात. त्यामुळे शहरामध्ये ज्वारीची मागणी दुपटीने वाढली आहे. पुण्याइतकीच राज्यातील अन्य भागांतही ज्वारीला वाढती मागणी आहे.
“ज्वारीचे आवक वाढली आहे. शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसामुळे पिकाला जीवदान मिळाल्याने यंदा बंपर पीक निघण्याचा अंदाज आहे. आवक वाढल्यामुळे भावात घसरण झाली आहे.” – विजय मुथा, ज्वारीचे व्यापारी