सातारा- प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या जिल्हा शल्य चिकित्सक पदावर सार्वजनिक आरोग्य विभागाने गुरुवारी शिक्कामोर्तब केले .
नाशिकचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांची प्रशासकीय कारणास्तव शस्त्रक्रिया विभागाचे वर्ग १ अधिकारी म्हणून येथे बदली लागली आहे . डॉ जगदाळे यांच्या सेवानिवृत्तीचे दहा महिने शिल्लक आहेत. वादग्रस्त ठरलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांची बदली साताऱ्यातून रत्नागिरीच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक म्हणून झाली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव विनायक घोडके यांच्या स्वाक्षरीने 43 वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे गॅझेट गुरुवारी प्रसिद्ध झाले. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी तत्काळ हजर व्हावे तसेच बदली अधिकाऱ्यांना कोणतीही रजा मंजूर करण्यात येऊ नये, असे आरोग्य विभागाने निर्देशित केले आहे . विहित मुदतीत पदस्थापनेवर हजर न झाल्यास शिस्तभंग व प्रशासकीय कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. कराड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन विठठल तडस यांची बुलढाणा येथे जिल्हा शल्यचिकित्सक पदावर बदली झाली आहे . डॉ भाऊसाहेब चंदगौडा केम्पीपाटील यांची कोल्हापूरवरून सातारा रुग्णालय प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे .
डॉ सुभाष चव्हाण यांची तातडीने बदली रत्नागिरी वरून सातारा जिल्हा रुग्णालयात करण्यात आली होती . मात्र दोन महिने त्यांना प्रभारी काम पहावे लागत होते. डॉ. सुरेश जगदाळे यांच्या साताऱ्यातील बदलीचे स्वागत होत आहे. त्यांनी यापूर्वी चार वर्ष साताऱ्यात म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून सेवा बजावली आहे.