पणजी – जागतिक पोस्ट कार्ड दिन 2020 च्या पूर्वसंध्येला सावंतवाडी येथील पारंपरिक खेळणीवर आधारित छायाचित्र पोस्ट कार्डचे प्रकाशन करण्यात आले. यावर्षी टपाल खाते भारतातील पोस्टकार्डचे 151 वे वर्ष साजरे करत आहे.
हे प्रकाशन महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल हरीश अग्रवाल, गोवा विभागाचे पोस्ट मास्तर जनरल डॉ. एन. विनोदकुमार, वरिष्ठ टपाल अधीक्षक डॉ. सुधीर गोपाल जाखेरे यांच्या हस्ते टपाल भवन, पणजी येथे ऑनलाइन स्वरूपात करण्यात आले.
सावंतवाडी कला आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे, विशेषतः आंब्याच्या झाडापासून बनविलेली लाकडी खेळणी आणि गंजीफा म्हणून ओळखले जाणारे खेळण्याचे पत्ते. ही हस्तकला पारंपरिकपणे चितारी किंवा चित्रकार समाजाद्वारे केली जात असे.
सावंतवाडी खेळणी आंब्याच्या झाडाच्या लाकडापासून, त्याला विविध आकार देऊन तयार केली जाते. कटआउटच्या तुकड्यांना सॅंडरवर घासले जाते, त्यानंतर रंग देऊन आकर्षक खेळणी तयार केली जाते.