लोणंद – करोना काळात केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्यामुळे फलटण तालुक्यातील पाडेगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. स्मिता राजेश खरात यांचा आदर्श सरपंच तसेच कोविड योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
फलटण येथील एका मंगलकार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार स्मिता खरात यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी निर्भया पथक फलटण विभाग यांनी महिला सुरक्षितता याविषयी मार्गदर्शन केले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या महिलांचाह सिन्मान याठिकाणी करण्यात आला. सौ. खरात यांनी करोना काळात घेतलेले रक्तदान शिबिर, गरजु कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्य कीट, करोना पेशंटसाठी लागणारी काही औषधे तसेच पर्यावरण संवर्धनासाठी केलेले वृक्षारोपण, त्यांची केलेली जपणुक तसेच निर्भयापथक माध्यमातून केलेली महिला सुरक्षितता जनजागृती हे महत्वकांक्षी उपक्रम पाडेगावमध्ये घेतले आहेत.
या कार्यक्रमासाठी डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, डॉ. श्रीकांत करवा तसेच निर्भया पथक फलटण विभागाच्या सौ. वैभवी भोसले, सौ. आरुषी भोसले हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. महिला विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत असतात. स्वकौशल्य आणि कुटुंबियांचा पाठिंबा यांच्या आधारावर नावलौकिक मिळवत असताना गौरव झाल्यास त्यांना अधिक प्रेरणा मिळेल, त्यांना अधिक चांगले काम करण्यास ऊर्जा मिळेल असा विश्वास श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
हा पुरस्कार मिळाल्याचे आनंद, समाधान तर आहेच. पाडेगावचा सर्वांगीण विकास आमचे नेते, मार्गदर्शक रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), आ. दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करत असताना समाजकारण आणि राजकारणाचा वारसा जपत आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाजासाठी, आपल्या लोकांसाठी जी काही वैयक्तिक मदत करता येईल यासाठी नेहमी प्रयत्न असतो. हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी असून येणाऱ्या काळात आणखी चांगले काम करण्याचा मानस आहे.
सौ. स्मिता खरात,लोकनियुक्त सरपंच, पाडेगाव