पुणे – महापालिका निवडणुकांच्या तोंडावर प्रशासनाकडून शहरातील देखभाल दुरुस्तींच्या कामांसह वेगवेगळ्या विकासकामांसाठी काढण्यात येत असलेल्या निविदा मर्जीतील ठेकेदारांना मिळवून देण्यासाठी नगरसेवकांकडून धुमाकुळ घालण्यात आला आहे.
निविदा उघडण्याच्या काही दिवस आधी संबंधित कामासाठी निविदा भरलेल्या ठेकेदारांची कागदपत्रे योग्य नसल्याचे अथवा संबंधित निविदेची चौकशी करावी, अशा पत्रांचा भडीमार सुरू आहे. त्यात, काही प्रकरणांमध्ये सत्यता आढळून येत असली तरी अनेक प्रकरणांमध्ये पत्र माघारी घेण्यासाठी ठेकेदारांना बोलावून सेटलमेंट केली जात आहे. त्यामुळे, महापालिका अधिकारी चांगलेच हैराण झाले असून अनेक कामांच्या निविदा यामुळे रखडत आहेत. काही प्रकरणांमध्ये तर नगरसेवकांच्या सह्या असलेली पत्रे घेऊन त्यांचे स्विय सहायकच अधिकाऱ्यांना ठेकेदरांसोबत जाऊन धमकावत आहेत.
महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे, महापालिकेत विकासकामांची लगबग सुरू आहे. त्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. मात्र, या निविदा ठराविक ठेकेदारांना मिळवून देण्यासाठी मोठ्या अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत. विशेष म्हणजे, या निविदा संबंधित नगरसेवकांच्या प्रभागातील नसल्या तरी त्यांच्याकडून पत्रे देऊन निविदा प्रक्रिया थांबविण्यासाठी दबाव आणला जात आहे. तर, निविदा उघडायच्याच असतील तर आधी चौकशी करावी मगच त्या उघडण्यात याव्यात अशी मागणी केली जात आहे. तर, संबंधित निविदा भरणारे ठेकेदार या नगरसेवकांना भेटून गेल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पत्र मागे घेण्यात येत आहे.
पीए करतात दमदाटी
नगरसेवकांच्या नावाखाली त्यांचे पीए तसेच त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी अधिकाऱ्यांना धमकी देत असल्याचे समोर आले आहे. नगरसेवकांचे पत्र घेऊन हे पीए निविदा उघडण्याच्या एक किंवा दोन दिवस अधी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देऊन अशा धमक्या देण्याचे सत्र सुरू आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून अतिरिक्त आयुक्तांकडे याबाबत तक्रारी केल्या जात आहेत. मात्र, वाद नको म्हणून या बाबींकडे प्रशासनही सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असून त्याचा मनस्ताप अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे.