पुणे -सणांच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकांत येणाऱ्या नागरिकांना 25 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरदरम्यान 30 रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करावे लागणार आहे. विविध सणांनिमित्त रेल्वे स्थानकांत ये-जा करणाऱ्या नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तात्पुरत्या कालावधीसाठी ही दरवाढ केली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे स्थानकांतून सुटणाऱ्या बहुतांश रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाले आहे, प्रवाशांना स्थानकावर सोडण्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळी येतात. प्लॅटफॉर्मच्या आवारात प्रवाशां-व्यतिरिक्त अन्य नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पालन व्हावे, या हेतूने पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात वाढ केली आहे.
25 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरदरम्यान या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 10 नोव्हेंबरनंतर पुन्हा प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत 10 रुपये होणार आहे. या निर्णयामुळे आता प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्यांना प्लॅटफॉर्मच्या बाहेरच थांबावे लागणार आहे, तर प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी अधिकचे 20 रुपये मोजावे लागणार आहेत.