सातारा : सातारा तालुक्याचे भाग्यविधाते, अजिंक्य उद्योग समूहाचे शिपकार स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या २० व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक, समाजोपयोगी कार्यक्रम उत्साहात सम्पन्न झाले. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सुरु असलेल्या कीर्तन महोत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली.
यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ह .भ. प. संभाजी महाराज शेळके, ह. भ. प. बाबामहाराज गजवडीकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि वारकरी सांप्रदायातील मंडळी उपस्थित होते.
सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप बाजार आवार (कणसे ढाब्याजवळ, हायवे) येथे जातिवंत खिलार जनावरांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले. एहसास मतिमंद शाळेत अजित साळुंखे मित्र परिवार नागठाणे यांच्या वतीने मिष्टान्न वाटप करण्यात आले.
पोवई नाका येथे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रक्तदान शिबीर आणि अभिवादन कार्यक्रम झाला. यासह जिल्हा बँकेचे मुख्य कार्यालय आणि शाखा, विविध स्थानिक स्वराज्य संस्था, विविध गावच्या विकास सेवा सोसायट्या,ग्रामपंचायत कार्यालये आदी ठिकाणी स्व. भाऊसाहेब महाराज यांना अभिवादन करण्यात आले.