सातारा -प्रतापराव देशमुख हा माणूस किमयागार आहे. त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे. त्यांचे चरित्र समाजाला प्रेरणादायी आहे, असे मत प्रसिद्ध उद्योजक फरोख कूपर यांनी व्यक्त केले. औषध रसायन क्षेत्रातील ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव देशमुख यांच्या “श्रमश्रद्धेचा प्रवास’ या चरित्राचे प्रकाशन धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सभागृहात पत्रकार श्रीराम पवार यांच्या हस्ते झाले.
त्यावेळी कूपर बोलत होते. लेखक प्रतापराव देशमुख, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. ज्ञानदेव म्हस्के, चरित्र लेखक अनिल बोधे, अशोक धुमाळ उपस्थित होते. श्रीराम पवार म्हणाले, माणसाला प्रश्न पडल्यास तो जीवनात यशस्वी होतो. कर्मनिष्ठ प्रतापराव देशमुख यांच्यावर अनेक संकटे येऊनही ते व्यवसायात यशस्वी झाले. स्वप्ने पाहून पूर्ण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. काही वर्षांपूर्वी तंत्रज्ञान प्रगत नसतानादेखील ते व्यवसायात यशस्वी झाले. त्यांच्या कंपनीने गुणवत्ता सिद्ध केल्याने, अनेक उत्पादने देशाबाहेर विकली जात असून, नवनवीन संशोधन होत आहेत. डॉ. म्हस्के म्हणाले, प्रतापराव देशमुख हे रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी असल्याचा आनंद आहे. खेडेगावातील विद्यार्थ्याने उद्योग क्षेत्रात कमावलेले नाव प्रेरणादायी आहे.
प्रतापराव देशमुख म्हणाले, यशापयश नशिबावर अवलंबून असते. कुटुंब, नातेवाईक आणि परमेश्वराच्या आशीर्वादांशिवाय आयुष्यात यश मिळत नाही. प्रत्येकाने देवावर श्रद्धा ठेवली पाहिजे. औषध निर्माण व्यवसायात जगातील 60 टक्के भाग माझ्या कंपनीने व्यापला असून, त्यामागे समाजाची प्रेरणा आहे. बोधे म्हणाले, साताऱ्याच्या मातीतील प्रतापराव देशमुख यांचे कर्तृत्व मला शब्दात उतरवता आले. कृष्णाकाठी नांदगावमध्ये जन्मलेल्या देशमुख यांनी वयाच्या पंचेचाळीशीनंतर उद्योग क्षेत्रात यश मिळवले आहे.
देशमुख यांचे जावई अमरसिंह पाटणकर यांनी मनोगत व्यक्त केले. संदीप चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. बाबूराव शिंदे यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रा. निरंजन फरांदे यांनी सूत्रसंचालन केले. अनुया देशमुख यांनी आभार मानले. स्वातंत्र्यसैनिक बाबूराव घोरपडे यांच्या कुटुंबीयांना या चरित्राची पहिली प्रत भेट देण्यात आली.