सातारा – केंद्र सरकारने जिल्हा परिषदेच्या व मान्यता प्राप्त शाळा, विद्यार्थ्यांची माहिती एकत्र उपलब्ध व्हावी, या उद्देशाने यु-डायस प्रणाली सुरू केली आहे. या माध्यमातून माहिती संगणकीकृत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रणालीकडे शाळांनी पाठ फिरविल्याने यंदा विद्यार्थी कमी नोंदले गेले आहेत. जिल्ह्यातील १०० शाळा व नऊ हजार विद्यार्थ्यांची यु-डायस प्लस नोंदणी केली नाही.
जिल्हा परिषद व मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक, अनुदानित विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहायित एकत्रित माहिती मिळावी, या उद्देशाने केंद्राने यु-डायस प्लसच्या माध्यमातून पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची माहिती संगणकीकृत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी कमी नोंदले गेले आहेत. यंदा नोंदणी कमी झाल्याने याचा अंदाजपत्रकावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे समग्र शिक्षा अभियान कार्यालयाने जिल्हा परिषदांना पत्र पाठवून त्याच्या जिल्ह्यातील शाळांना तातडीने विद्यार्थी नोंदणीच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यात विद्यार्थी संख्येनुसार शाळांना निधी दिला जातो. त्यानुसार दरवर्षी शाळांनी विद्यार्थ्यांचा डाटा यु-आयस प्रणालीवर ऑनलाइन करून भरणे आवश्यक आहे. त्यामुळे आता यु-डायस नोंदणी करण्यासाठी मुदत दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, समग्र शिक्षा अभियानानुसार अनेक शाळांमधून ऑनलाइन नोंदणीसाठी संकेतस्थळ चालत नसल्याचे कारण दिले जात आहे. या नोंदी नसल्यास विद्यार्थ्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, याआधीच सर्व माहिती शासनाकडे उपलब्ध असताना पुन्हा माहिती कशासाठी भरायची? मुलांना शिकवायचे की माहिती भरत बसायचे? असाही एक मतप्रवाह शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
यु-डायस प्रणालीवर विद्यार्थी कोणत्या शाळेत, वर्गात शिकत असून, त्याची प्रगती कशी आहे? यांची माहिती मिळते. विद्यार्थी दुसऱ्या शाळेत अथवा त्याने शाळा सोडली तरी त्यांची माहिती उपलब्ध असते. विद्यार्थ्यांची खोटी संख्या दाखविण्यास आळा बसणार आहे. शिक्षणाच्या प्रवाहातून विद्यार्थी बाहेर पडल्यास त्याच प्रवाहात पुन्हा आणणे शक्य होणार आहे. यु-डायसद्वारे गाव, गट, तालुका, जिल्ह्यातील शाळा, विद्यार्थी, शिक्षक, विशेष बालक, परीक्षांच्या निकालाची माहिती मिळणार आहे.
विद्यार्थ्यांची नोंदणी आवश्यक
विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार निधीचा अंदाजपत्रकात समावेश करण्यात येतो. केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणी देखील विद्यार्थी संख्येनुसार केली जाते. यात प्रामुख्याने गणवेश वाटप, मोफत पाठ्यपुस्तके यासह पोषण आहारांचा समावेश आहे. त्यामुळे यु-डायस प्लसमध्ये शाळा व विद्यार्थ्यांची तंतोतंत नोंदे होणे आवश्यक आहे.
यु-डायस प्रणालीवर शाळा नोंदणीसंदर्भात गटशिक्षणाधिकारी यांच्यासमवेत चर्चा करून सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यशाळा देखील घेण्यात आल्या आहेत. ज्या शाळांची नोंदणी झाली असून, त्यांच्या नोंदणीवेळी झालेल्या चुका दुरुस्त करून अंतिम केले जात आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर आहे.
-शबनम मुजावर (शिक्षणाधिकारी, प्राथमिक)