सातारा – सातारा तालुक्यातील जैतापूर गावाला प्रत्यक्ष कृतीतून स्वच्छतेचा मूलमंत्र देत वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन करत लोकसहभागातून या गावाचा चेहरा मोहरा बदलण्यात मौलिक योगदान देणाऱ्या व गरिबांचा डॉक्टर म्हणून लौकिक मिळवलेल्या डॉ. चंद्रकांत शेटे यांचा अमृत महोत्सव सोहळा गावकऱ्यांनी रविवारी (दि. २४) आयोजित केला आहे.
डॉ. शेटे यांनी गेल्या पन्नास वर्षात जैतापूर गावासाठी समर्पित भावनेने केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन डॉ. चंद्रकांत शेटे स्वच्छता समूह, ग्रामपंचायत जैतापूर व ग्रामस्थांनी केले आहे.
यानिमित्त रविवारी सकाळी सात ते आठ या वेळेत वृक्षारोपण, सायंकाळी चार वाजता डॉक्टरांच्या सन्मानार्थ उभारलेल्या स्वागत कमानीचे लोकार्पण, त्यानंतर अमृत महोत्सवानिमित्त सत्कार अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. दिलीप पाटील – शिरगावकर उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार गजानन चेणगे भूषवणार आहेत.
डॉ. चंद्रकांत शेटे हे मूळचे सांगली जिल्ह्यातील तासगावचे असले तरी त्यांचे वास्तव्य साताऱ्यात आहे. गेली पन्नास वर्षे ते जैतापूर गावात वैद्यकीय सेवा देत आहेत. पैशापेक्षा सेवेला महत्त्व देणाऱ्या या डॉक्टरांकडे अत्यल्प मोबदल्यात वैद्यकीय सेवा मिळत असल्याने गरिबांचा डॉक्टर म्हणून त्यांना सर्वजण ओळखतात. सामाजिक बांधिलकी, वृक्ष संवर्धन तसेच ग्राम स्वच्छता याचे संस्कार कृतीतून घडवत त्यांनी गावाच्या भल्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी जैतापुरात निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याने प्रेरित होऊन गावकऱ्यांनी त्यांना दवाखाना बांधून दिला आहे. आता पंचाहत्तरीनिमित्त त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन गावकऱ्यांनी केले आहे.