पुसेगाव – सातारा ते कोरेगावमार्गे पुसेगाव- पंढरपूर रस्त्याचे कोरेगाव शहरातील रस्त्याचे बरेच वर्षे रखडलेले काम, रस्त्यावर पडलेले मोठ मोठे खड्डे, वाहतूक नियंत्रण नसल्याने नेहमी होणारी वाहतूक कोंडी, या प्रश्नांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोरेगावात मध्यवर्ती जुना स्टॅंड परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सातारा- पंढरपूर रस्ता तातडीने झालाच पाहिजे. तीन वर्षे रखडलेल्या रस्त्याला जबाबदार कोण, होणारे अपघात टाळा अशा घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत गेला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, संजना जगदाळे, श्रीमंत दादा झांजुर्णे, श्रीमंत भाऊ झांजुर्णे, अरुण माने, डॉ. गणेश होळ, प्रतिभा बर्गे, संजय पिसाळ, नाना भिलारे, अजय कदम, अमर बर्गे, किशोर बर्गे, संजीवनी बर्गे, हेमंत बर्गे, प्रीतम बर्गे, गणेश धनवडे, नितीन लावंगरे, अजित बर्गे, सचिन बर्गे, सनी शिर्के, माधुरी चव्हाण, मंदा बर्गे, संगीता बर्गे, प्रभाकर बर्गे, सागर बर्गे, ऍड. सुनील भोसले, फर्दिन मुजावर व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
रस्त्याची दुरवस्था झाल्याने शहरातील नागरिकांना, वाहनधारक, दुकानदार, व्यापारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वारंवार अपघात होऊन जीवितहानी होत आहे. वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वाहतूक नियंत्रण यंत्रणा सम- विषम पार्किग टोईंग यंत्रणा बंद असल्याने जनतेच्या हालअपेष्टांमध्ये अजूनच भर पडत आहे. या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. सतत होणाऱ्या वित्तहानीसोबत जीवितहानीला तोंड द्यावे लागत असून प्रशासनातर्फे कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही. अधीक्षक अभियंत्यांतर्फे त्वरित रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी करणारे निवेदन कोरेगाव तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले.