लाहोर – पाकिस्तानात आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमधील “पॉलिटिकल इंजिनिअरींग’ पासून लष्कराने दूर रहावे, अशी सूचना माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. पाकिस्तानला आर्थिक आरिष्ट्यामधून केवळ आपला पक्षच बाहेर काढू शकतो, असा विश्वासदेखील इम्रान खान यांनी व्यक्त केला आहे.
कराचीमध्ये पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाच्या महिलांच्या मेळाव्याला लाहोरमधील निवासस्थानातून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून इम्रान खान संबोधित करत होते. पंतप्रधानपदावरून आपल्याला हटवले जाण्यामागे माजी लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचाच हात होता, या आपल्या आरोपाचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
लष्कराने पूर्वी ज्या चूका केल्या त्यातून काहीही धडा घेतला नाही. आगामी निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचे नुकसान करण्यासाठी अजूनही “पॉलिटिकल इंजिनिअरींग’ केले जाते आहे, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
Karnataka : कॉंग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्यावरील ‘त्या’ पुस्तकाला Congressचा जोरदार आक्षेप
मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटशी संबंधित भिन्न गटांना कराचीमध्ये एकत्र आणण्याचा प्रयत्न लष्कराच्या माध्यमातून केला जातो आहे. आपल्या पक्षाच्या वाढत्या ताकदीची भीती वाटत असल्यामुळे बलुचिस्तान आवामी पार्टीच्या नेत्यांना दक्षिण पंजाबमधून पाकिस्तान पीपल्स पार्टीमध्ये आणले जाते आहे. नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षाला पुन्हा सत्तेवर आणण्याचा प्रयत्नही लष्कराच्यावतीने केला जातो आहे, असा आरोपही इम्रान खान यांनी केला.