आमदार बच्चू कडू यांची घोषणा; आमची युती जनतेशी
दहिवडी/वडूज : आम्ही युती करत नाही. आमची युती जनतेसोबत आहे. या मतदारसंघात आम्ही पक्के ठरवले आहे. माण- खटाव मतदारसंघातून खात्रीने सांगतो, 120 टक्के निवडणूक आम्ही लढवणार आहोत. माण खटाव तालुक्यामध्ये सुमारे 28 हजार मतदार हे दिव्यांग आहेत आणि ते आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे आम्हाला काळजी करण्याचे कारण नाही”, अशी घोषणा प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी केली.
दहिवडी येथे आमदार बच्चू कडू यांची जाहीर सभा पार पडली. अपंग, दिव्यांग विधवा बांधव सहभागी झाले होते. यावेळी खटाव तालुका अध्यक्ष सागर देवकर, संपर्कप्रमुख गणेश सातपुते, उपसंपर्कप्रमुख शरद गायकवाड, वडूज शहराध्यक्ष प्रमोद पावडे, मांडवे गावचे सोसायटी संचालक व प्रहार जनशक्ती पक्ष अपंगमित्र अशोक देशमुख, माण तालुका अध्यक्ष नंदकिशोर पवार विधानसभा क्षेत्र प्रमुख अतिश माने, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख नाथा शिंदे अमोल कारंडे आदीची प्रमुख उपस्थिती होती.
बच्चू कडू म्हणाले, सरकार शेतकऱ्याला मदत द्यायला अपयशी ठरले, त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा पुढे आला आहे. पूर्वी नोकरीवाल्याला कोण पोरगी देत नव्हतं. त्यावेळी शेतकऱ्यांला पोरगी दिली जात होती. आता आता शेतकऱ्याला इतका खालच्या दर्जात नेऊन ठेवले आहे. तेथे काम करताना आत्महत्या होत आहेत. आंदोलने होत आहेत. प्रत्येक वर्षी आंदाेलने करण्यापेक्षा यावर कायमस्वरुपी तोडगा निघाला पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्याला आर्थिक निकषावर आरक्षण मिळाले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. मतदारसंघात दिला जाणारा उमेदवार हा सर्वसामान्य जनतेला असून, तो चांगले आव्हान उभे करेल’, असा विश्वास कडूंनी व्यक्त केला.
प्रहारचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे म्हणाले, अद्यापही आपण आपले हक्काचे मंजूर पाणी पूर्णपणे उचलू शकलो नाही. आपला भाग दुष्काळमुक्त झाला नाही. ज्या तिन्ही योजनेद्वारे काही पाणी आणले गेले आहे किंवा आणले जाणार आहे ते बहुतेक पाणी पंपाद्वारे उचलून आणावे लागणार आहे. त्यासाठी मोठमोठ्या ताकदीच्या मोटारींची गरज आहे.
या सर्व योजनेतील बहुतेक पाणी मोटारीद्वारे उचलले जाणार आहे. त्यासाठी दिवसाला लाखो रुपये लाईटबिल भरावे लागते. काही प्रमाणात पाणी बोगद्यातून आणले जाणार आहे. अद्यापी बोगद्याचे काम चालू असल्याचे समजते. सदर लाईटबिलाची रक्कम सर्व लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीच्या प्रमाणात पैसे गोळा पैसे भरले तरच शक्य आहे. परंतु राजकीय गटातटाच्या राजकारणामुळे सर्व शेतकरी एकत्र येऊच शकत नाही.
त्यामुळे गेली कित्येक वर्षे आपण हे पाणी उचलू शकलो नाही. त्यामुळे आपोआपच आपले हक्काचे सदर पाणी इतर आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकरी वापरत आहे. शासन आणि काही नेतेमंडळीच्या नाकर्तेपणामुळे आपल्याला हे सर्व सहन करावे लागते. आणि नाविलाजने दुष्काळी परिस्थितीला तोंड दयावे लागते.असेही ते म्हणाले. यावेळी खटाव माण तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.