सातारा : लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेची बांधणी

भावी उमेदवारांची धावाधाव, कल चाचणीवर भर

सातारा : देशभरात जिकडे तिकडे निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे प्रचारसभा मेळावे पदयात्रा यामधून उमेदवाराची धावाधावा सुरु आहे जिंकण्यासाठी काहीपण करण्याकडे नेत्याचा कल आहे यात सर्वच जण आपआपल्या परीने हात धुवून घेत आहेत उमेदवारचा प्रचार पण..मात्र त्यात स्वत:चा स्वार्थी अशा दुहेरी वृत्तीचे दर्शन या निवडणूकीच्या निमित्याने दिसून येत आहे रणसंग्राम लोकसभेचा पण अनेकजण यामध्ये विधानसभेची खेळी करीत आहेत सातारा जिल्हयात हे ही चित्र जाणवत आहे. लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचारात आघाडीवर राहताना स्वत:साठी येणाऱ्या विधानसभेची ही कलचाचणी करताना राजकीय मंडळी दिसून येत आहे त्याच्या दुष्टीने ही एक रंगीततालीम होत आहे.

लोकसभा निवडणूकीच्या माध्यमातून वेगवेगळया पक्षातील नेतेमंडळी विधानसभेची उमेदवारीची पेरणी करताना दिसून येत आहेत. आपल्या सोयीच्या राजकारणाकडे ते अधिक लक्ष देत ही राजकिय मंडळी कार्यकर्ते व सगेसोसरे यांची जुळवाजुळव करीत आहेत. येणारी विधानसभा निवडणूक हेच एकमेव लक्ष्य ठेवत ही मंडळी लोकसभेच्या प्रचारात दंग आहे.

सन 2019 च्या सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले हे उभे आहेत. त्यांच्या प्रचारात राष्ट्रवादीचे आमदारबरोबरच भावी आमदारकीचे स्वप्न पाहणारे नेते मंडळी सक्रिय झाले आहेत. त्याचप्रमाणे भाजपा शिवसेनेचे व मित्रपक्षांचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारात ही आमदारकीचे स्वप्न पाहणारे प्रचारात सक्रिय होत युतीचे नेतेमंडळी एकवटले आहेत.

यामध्ये कोरेगांव मतदार संघासाठी महेश शिंदे, सातारा जावली मतदार संघासाठी दिपक पवार, कराड दक्षिण मतदार संघासाठी डॉ. अतुल भोसले, कराड उत्तर मतदार संघासाठी मनोज घोरपडे, वाई खंडाळा महाबळेश्‍वर मतदार संघासाठी मदनदादा भोसले, माण खटाव मतदार संघासाठी डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई, ही मंडळी लोकसभेच्या प्रचार यंत्रणेत आमदारकीची बांधणी करत आहेत. तर पाटण येथे शिवसेनेचे आमदार शंभुराज देसाई हे पुन्हा आमदारसाठी बांधणी करत आहेत. असेच काहीसे फलटण मतदार संघातही घडत आहे. त्यामुळे सन 2019 ची लोकसभा निवडणूक अनेकासाठी राजकिय रंगीत तालीम ठरत आहे.

अनेक भावी आमदार मतदार संघात बांधणी करत भेटीगाटी घेत असल्याचे दिसून येत आहे. लोकसभेच्या प्रचारात सक्रिय राहताना कोणत्या विभागात कोणत्या पक्षाचे प्राबल्य आहे. याचा ही या निमित्याने ते आढावा घेत आहेत. याच आढावाच्या आधारे होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीची रणनिती भावी आमदार म्हणून स्वप्न पाहणारी नेतेमंडळी ठरवत आहेत. या निमित्याने ते मतदारांचा कल अजमावत असताना पक्षाच्या व नेत्यांच्या प्रचाराचा मात्र आव आणत स्वत:ची राजकिय बांधणी साधण्याचा प्रयत्न सर्वच सध्या राजकिय मंडळीकडून होत आहे लोकसभेच्या निमित्याने या मंडळीना ही नामी संधी उपलब्ध झाली आहे.

लोकसभा मतदार संघात सध्या प्रचाराला वेग आला आहे. जिकडे तिकडे सभा, मेळावे, पदयात्रा संपुर्ण जिल्हा ढवळून गेला आहे. लोकसभेत जिकणार कोण हरणार कोण याबाबत अनेकांचे वेगवेगळी मते आहेत. हे जरी चित्र असले तरी अनेक राजकीय मंडळी मात्र विधानसभेची या निमित्याने तयारी करत आहे हे तितेकच सत्य आहे.

“राष्ट्रवादीच्या बाल्लेकिल्यात युती मुसंडी मारणार का याबाबत उलटसुलट चर्चा आहे. लोकसभेच्या निकालावरच सातारच्या विधानसभेचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे विधानसभा इच्छूक उमेदवार लोकसभेच्या प्रचार यंत्रणेत सक्रिय सहभाग घेत आपली राजकिय चाचपणी करीत आहेत. सध्या विधानसभेसाठी कॉग्रेस राष्ट्रवादी आघाडी व भाजपा शिवसेना युतीचे अनेक जण इच्छुक आहेत. ते सर्व जण आपआपल्या पक्षासाठी झटत असले तरी विधानसभेची बांधणी हेच एकमेव त्यांचे लक्ष्य आहे.

-श्रीरंग काटेकर, सातारा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.