कराड -शहरात डेंगी व चिकुनगुनियासारखे रोग पसरू नयेत, तसेच डासांची उत्पत्ती नियंत्रणात आणण्यासाठी नगरपालिकेकडून कराडात “फाइट द बाइट’ या अभियान राबवण्यात आले. यातील सर्व्हेनुसार शहरातील 45 रुग्णालयांत ऑगस्टमध्ये डेंगीचे केवळ पाच, तर चिकुनगुनियाचा एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे शहरात दोन्ही रोग नियंत्रणात असून नागरिकांनी बाळगण्याची गरज नाही, असे आवाहन नगरपालिकेचे आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी केले प्रसिद्धीपत्रकाद्वारे आहे.
या प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, शहरात पालिकेकडून स्वच्छतेच्या दैनंदिन कामांसह सार्वजनिक आरोग्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये डासांच्या विरोधात मे महिन्यापासून “फाइट द बाइट’ अभियान सुरू करण्यात आले आहे. मे, जून व जुलै या कालावधीत डेंगी व चिकुनगुनियाचा त्रास होतो.
त्या विरोधात नगरपालिकेकडून प्रभावीपणे मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील प्रय्तेक भागात आरोग्य विभाग व ग्रीनी टीमकडून घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. त्यामध्ये घरोघरी पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या. यावेळी घरातील फ्रीजमध्ये डेंगीच्या आळ्या असतात, त्याबाबत नागरिकांना सतर्कही करण्यात आले आहे.
तसेच डेंगी, चिकुनगुनिया रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील 45 रुग्णालयांतील अपडेट ग्रीनी टीमकडून घेण्यात येत आहे. त्यामध्ये जुलै ते 19 ऑगस्ट अखेर डेंगीचे पाच, तर चिकुनगुनियाचा केवळ एक रुग्ण दाखल असल्याचे निदर्शनास आले आहे. शहर व परिसरात सुमारे 300 रुग्णालये असून येथे उपचारासाठी तालुक्यासह अन्य जिल्ह्यातून रुग्ण दाखल होतात. त्यामुळे त्या रुग्णांचा शहराशी संबंध येत नाही.
शहरात नगरपालिका सातत्याने राबवत असलेल्या विविध डास प्रतिबंधक उपाययोजनांमुळे शहरात डेंगी व चिकुनगुनिया आजाराचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, या दोन्ही आजारांबाबत नागरिकांमध्ये विनाकारण भीती निर्माण झाल्याचेही चित्र दिसत आहे. जरी या आजाराचे प्रमाण कमी झाले असले, पालिकेकडून पुढील दोन महिने जास्त खबरदारी घेण्यात येणार असून नागरिकांनीही यासंदार्भात कराड नगरपालिकेला माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही आरोग्यसभापती वाटेगावकर यांनी सदर प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.