फलटण – भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला फलटण येथे अपघात झाला असून ते जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा फलटण-लोणंद रस्त्यावर फलटण शहरानजिकच्या स्मशानभूमीजवळ बाणगंगा नदीवरील पुलावरून गाडी ५० फूट खाली कोसळून हा अपघात झाला आहे. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आमदार जयकुमार गोरे लोणंदकडून फलटणच्या दिशेने येत असताना चालकाला पुलाचा अंदाज न आल्याने वेगात असणारी गाडी पुलावरून खाली कोसळली.
यामध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक, बाँडीगार्ड आणि चालक असे चौघेजण जखमी झाले आहेत . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना याबाबत आमदार जयकुमार गोरे यांनी जखमी अवस्थेत मोबाइलवरुन कळवताच पुढील चक्रे फिरुन जखमींना फलटण, बारामती आणि नंतर पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.