जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या १३ वर
सातारा (प्रतिनिधी) : कराडमधील आणखी दोन संशयितांचे अहवाल पाँझिटिव्ह आले असून या दोन रुग्णांमुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १३ झाली आहे. त्यापैकी दोघांचा म्रुत्यू झाला आहे. तर तिघे करोनामुक्त झाले आहेत.
मागच्या महिन्यात नागपूरवरून प्रवास करून आलेल्या ३५ वर्षीय तरुणाला कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये घसा दुखत असल्यामुळे आणि तापामुळे दाखल केले होते. त्याचा अहवाल रविवारी आला असून तो करोनाबाधित निघाला आहे.
तर कराडच्या उपजिल्हा रुग्णालय कराड येथे ३० वर्षीय युवक गेल्या महिन्यात पुण्यावरून आला होता, त्याला ताप आणि घसा दुखत असल्यामुळे भरती केले होते. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले असून हे दोन रुग्ण करोनाबाधित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. रुग्णालयात दाखल असलेल्या या करोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नियमानुसार निगराणीखाली उपचार सुरु आहेत, असे त्यांनी सांगितले.