पुणे (प्रतिनिधी) – करोना विषाणूचा प्रभाव वाढत चालल्याने खबदारीचा उपाय म्हणून पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांचे संकलन करण्यासाठी जिल्हानिहाय संकलन केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
पुणे विभागात पुणे, अहमदनगर, सोलापूर या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. या पुणे विभागातून इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी २ लाख ८५ हजार ४६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. परीक्षेत ८ माध्यम व ७५ विषय होते. इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी २ लाख ५३ हजार ७४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. या परीक्षेकरिता ६ माध्यम व ६१ विषय होते. गेल्या महिन्यापासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनही ३ मे पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. जिल्हा बंदीही कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शाळांमध्ये असलेल्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी व तपासलेल्या उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी शिक्षकांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे.
विविध भागात कामकाजानिमित्त संचार करण्यासाठी या शिक्षकांना पोलीस विभागाच्या वेबसाईटवर माहिती भरुन डिजीटल पास मिळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र अद्याप करो नाच्या भितीमुळे हे पास घेण्यासाठी शिक्षकांनी काहीच पुढाकार घेतल्याचे आढळून येत नाही. या पार्श्वभूमीवर परीक्षेचे निकाल वेळेत लागावेत यासाठी कामकाज पद्धत राबविण्याबाबत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे, सचिव प्रा. संतोष फाजगे यांनी पुणे विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव बी.के.दहिफळे यांना विविध मागण्याचे निवेदन दिले आहे.
प्रत्येक जिल्ह्यात तपासलेल्या उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी चार केंद्र सुरु करावीत, मुख्य नियमकांमार्फत उत्तरपत्रिकांची आकडेवारी एस एमएसच्या माध्यमातून घेण्यात यावी, ईमेल किंवा पोस्टाच्या माध्यमातून परीक्षक व नियामक यांची गुणपत्रके बोर्डाने मागविणे, सर्व नियामकांना उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी एकाच वेळी न बोलविता प्राप्त माहिती व उत्तरपत्रिकांच्या संख्येनुसार नियोजित वेळापत्रक बोर्डाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे , उत्तरपत्रिका व गुणपत्रिका जमा करण्यासाठी गर्दी टाळणे आदी मागण्या महासंघाने केल्या आहेत.
“दहावी व बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणी व त्या जमा करण्याचे कामकाज लवकर पूर्ण व्हावे यासाठी महत्वपूर्ण नियोजन करण्याच्या हालचाली सुरु केलेल्या आहेत. मुख्य नियामक, नियामक, परीक्षक व अधिकारी यांच्याकडून आढावा घेण्यात येणार आहे. त्यानुसार लवकर महत्वाचा निर्णय घेण्यात येणार असून त्याबाबतच्या सूचना परीक्षेच्या कामकाजातील शिक्षकांना देण्यात येतील. शिक्षक महासंघाच्या मागण्याचा सकारात्मक विचार करण्यात येईल.” – बी.के.दहिफळे (सचिव, पुणे विभागीय शिक्षण मंडळ)