सातारा – मंगळवार तळ्याकडून शाहूपुरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अनंत इंग्लिश स्कूल ते गेंडामाळ नाका यादरम्यानचे ब्रिटीशकालीन दोन्ही पूल पाडत त्याठिकाणी नवीन पूल बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी दुपारी अर्कशाळेच्या पाठीमागील पुलाचे पाडकाम सुरू करण्यात आले.
या मार्गावर दोन पूल असून त्यावरून दररोज मालवाहू, प्रवासी वाहनांसह इतर वाहने तसेच पादचारी, विद्यार्थी यांची येजा सुरू असते. वाढलेली वर्दळ व इतर कारणांमुळे हे पूल वाहतुकीसाठी कमी पडत होते. यामुळे हे दोन्ही पूल पाडत त्याठिकाणी नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला. यानुसार पहिल्या टप्प्यात एक पूल पाडून तो नव्याने बांधल्यावर दुसऱ्या पुलाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
यासाठी पालिकेने पोलिसांच्या मदतीने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचा आराखडा तयार केला आहे. यानुसार गुरुवारी गेंडामाळ नाका ते कोटेश्वर कॉलनी या टप्प्यातील वाहतूक बंद करत पूल पाडकाम सुरू करण्यात आले. अपघात घडू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत.