भुईंज – वाई -सातारा रस्त्यावर पाचवड येथे उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात उंब्रज, ता. कराड येथील दांपत्य जागीच ठार झाले. मांढरदेवीचे दर्शन घेऊन घरी जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत होती. सोमनाथ नानासो चव्हाण (वय 46) व त्यांची पत्नी रेखा सोमनाथ चव्हाण (वय 40 दोघे रा. लक्ष्मीनगर, उंब्रज, ता. कराड) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळ आणि भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरूवारी (दि. 21 रोजी) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मांढरदेवीचे दर्शन घेऊन सोमनाथ चव्हाण व रेखा चव्हाण हे त्यांच्या दुचाकी क्रमांक (एम. एच. – 50 एच – 6324) वरुन उंब्रजला परत निघाले होते. यावेळी पाचवड गावानजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रक क्रमांक (एम. एच. – 10 सी. क्यू – 6129) ला पाठीमागून त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली.
ही धडक जोरदार असल्याने ते रस्त्यावर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. जोराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. पोलिसांना घटना कळवण्यात आल्यानंतर भुईंज पोलीस ठाण्याचे कर्मचारी आले. अपघातानंतर मदतकार्य तातडीने मिळाले पण तो पर्यंत सारे काही संपले होते. या अपघातातील घटनास्थळाचे निपजित पडलेले मृतदेह पाहून सगळा परिसर गहिवरला. त्यांनी अपघाताचा पंचनामा करुन मृतदेह भुईज प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. नातेवाईक आल्यानंतर मृतदेहांची ओळख पटल्यानंतर रात्री उशीरापर्यंत शवविच्छेदनासाठी कार्यवाही सुरू होती.
दरम्यान, वाई पाचवड या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने वारंवार दुरूस्ती व अतिक्रमणे काढुन रूंदावलेला हा रस्ता या अपघातानंतर पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडला आहे. या अपघाताची चौकशी सपोनि रमेश गर्जे करत असून अद्याप कोणावर गुन्हा दाखल झालेला नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे व हवालदार आप्पासाहेव कोलवडकर करत आहेत.