खंडाळा – म्हावशी, ता. खंडाळा येथे झालेल्या दुचाकीच्या अपघातात संस्कार लक्ष्मण राऊत (वय 13) या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. लहान वयात गाडी चालवण्याचा मोह त्याच्या जीवावर बेतला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संस्कार राऊत याला गाडी चालवता येत नव्हती, तरीही त्याने दुचाकी चालवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दुचाकीचा अॅक्सिलरेटर पिळला गेला. समोर कच्चा रस्ता आणि उतार असल्याने त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले.
ही दुचाकी शेजारी राहणार्या बाळू राऊत यांच्या घराच्या भिंतीवर आदळली. या अपघातात संस्कारच्या डोक्याला, पोटाला, छातीला आणि उजव्या पायाला गंभीर मार लागला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले असता, तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वरे तपास करत आहेत.