सातारा – जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून माण, खटाव, वाई, कराड या चार तालुक्यांतील 13 गावे व 43 वाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 15 हजार 544 नागरिक आणि तीन हजार 324 पशुधनाची तहान या पाण्यावर अवलंबून आहे. संभाव्य टंचाई परिस्थितीचा विचार करून 13 विहिरी व 11 बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
एप्रिल महिन्यापासून उकाडा प्रचंड वाढला असून बहुतांश भागात पाणी पातळी खालावली आहे. वाढत्या उष्णतेने जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. नागरिकांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील काही वाडीवस्ती व गावांमध्ये टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यापासून राज्यभरात उष्णतेच्या लाटा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहे. अनेक ठिकाणी उष्माघाताचा त्रास सुरू झाला आहे. वाढत्या उष्णतेने जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने बहुतांश ठिकाणी विहिरी व बोअरवेल ओस पडू लागल्याआहेत. त्यामुळे काही भागात पाणीटंचाईचा प्रश्न उभा राहिला आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये शासनाने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला आहे.
जिल्ह्यात यावर्षी एप्रिल महिन्याच्या मध्यावर टंचाई निवारणासाठी पहिला टॅंकर सुरू झाला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मागणीनुसार टॅंकर सुरू करण्यात आले. वाई तालुक्यातील गुंडेवाडी, बालेघर अंतर्गत कासुर्डेवाडी, अनपटवाडी, मांढरदेव अंतर्गत गाडगेवाडी, पाटण तालुक्यात ढेबेवाडी अंतर्गत आंब्रुळकरवाडी, भोसगाव, कराड तालुक्यातील वानरवाडी, बामणवाडी, गोडवाडी, गायकवाडवाडी या ठिकाणी पाणीटंचाई असल्याने शासनाचे टॅंकर सुरू आहेत. संभाव्य पाणीटंचाईचा विचार करुन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी विहिरी व बोअरवेल अधिग्रहित करण्यात येत आहेत. एकही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू नये, यादृष्टीने जिल्हा परिषदेकडून नियोजन करण्यात आले आहे. सद्य परिस्थितीत 13 गावे व 43 वाड्यांना आठ शासकीय तर तीन खासगी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून 13 विहिरी व 11 बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
माण तालुक्यात दुष्काळाची दाहकता :माण तालुक्यात बिदाल मंडलामधील पांगरी गावठाण, पंधरकी, लांडगोबा वस्ती, खरात वस्ती, स्टॅंड परिसर, धुळाची मळवी, मोरदरा, जाधववस्ती, मुलाणीवस्ती, लोखंडेवस्ती, वाघाडी, बिरोबानगर, बेरडकी अशा 13 वाड्या, वडगाव हद्दीतील उंबरमळा, बिघावस्ती, खंडोबावस्ती, हुबेवस्ती, पवारवस्ती, काकाचीवस्ती, पवारमळा, कोकरेवाडी, दडसवाडा, स्टॅंड परिसर, ढमाळवस्ती, दौलती मोहीचे शेत, तालीचे शेत, खांडे पवार वस्ती, पिरवाडी अशा 16 वाड्या, पाचवड अंतर्गत गावठाण व शिंगाडेवस्ती वाडी, मोगराळे अंतर्गत गावठाण, आमजाईवस्ती, घानवडावस्ती अशा दोन वाड्या, बिजवडी अंतर्गत गावठाण, गोसावीवस्ती, लिंबखोरी, कवटवस्ती, शिनगारेवस्ती अशा चार वाड्या, मलवडी मंडल अंतर्गत वारुगडमधील मठवस्ती, खांडेवाडी, उगळेवाडी, गरडाचीवाडी, गायदरा अशा पाच वाड्या असे मिळून माण तालुक्यात 6 गावे व 40 वाड्यांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.