मेढा (प्रतिनिधी) – वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा जावळी तालुक्याच्यावतीने हजारोंच्या उपस्थितीत मेढा येथील वसंतगडावर शुक्रवारी भव्य नागरी सत्कार करण्यात आला. जावळीकरांनी माझ्यावर दाखवलेले प्रेम आणि विश्वास असाच ठेवावा. जनता जनार्दनाचे हे ऋण विसरणार नाही. खोटं कधी करणार नाही, खोटं कधी करत नाही. विकासातून तालुक्याचा चेहरा बदलण्याचे काम मी करतोय. यापुढेही करत राहणार, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
यावेळी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, एकनाथ ओंबळे, जयदीप शिंदे, सागर धनावडे, समीर आतार, विजय शेलार, पांडुरंग जवळ, शिवाजीराव मर्ढेकर, श्रीहरी गोळे, गीता लोखंडे उपस्थित होत्या.
मानकुमरे म्हणाले, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी जावळीचा चौफेर विकास केला आहे. माझ्या 30 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत बाबांइतका तालुक्याचा विकास इतर कोणीच केला नाही. जावळीत यापुढे फक्त बाबाराजे आणि त्यांच्या विचारांचाच उमेदवार आम्ही निवडून देणार. प्रमोद पवार यांनी स्वागत केले. मच्छिंद्र क्षीरसागर यांनी आभार मानले.
शेतकर्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील
जावळीतील शेतकर्यांची उन्नती होत राहील, असेच काम करत असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. मानकुमरे म्हणाले, आता कार्यक्रमात तुतारी वाजवणे आम्ही बंद केले असून, हलगी व घुमक वाजवून स्वागत सुरू केले आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजेंना कॅबिनेट मंत्रिपद द्यावे. हे काम पक्षाने करावे, अशी मागणी मानकुमरे आणि रांजणे यांनी केली.
मी पक्षाशी एकनिष्ठ
मी सध्या आमदारकीमध्ये खूश आहे. मंत्रिपदाची इच्छा आहे. कारण मंत्रिपदाच्या माध्यमातून अधिक विकासकामे होतात. त्यासाठी मंत्रिपद हवे. योग्य वेळ येईल तेव्हा ते मिळेल. मी पक्षाशी एकनिष्ठ असून, बरोबर असणार्यांना माझ्याकडून कधीही दगाफटका होणार नाही, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.