सातारा – ईक्षण आणि श्लोक घोरपडे या सातारच्या दोन मुलांनी अनुक्रमे 12 व 17 वर्षांखालील गटात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मोटोक्रॉस स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे.
येथील ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक आणि बास्केटबॉल व मोटोक्रॉसची आवड असलेल्या रमेश शानभाग यांच्या ईक्षण व श्लोक घोरपडे या नातवांनी बडोदा, नाशिक, कोईम्बतूर, जयपूर व गोवा येथे झालेल्या मोग्रीप मोटोक्रॉस स्पर्धेत पहिला व दुसरा क्रमांक मिळवला होता.
गोवा येथे नुकत्याच झालेल्या मोग्रीप मोटोक्रॉस स्पर्धेत श्लोकने 17 वर्षांखालील गटात तिसरा तर 12 वर्षांखालील गटात दुसरा क्रमांक मिळवला. ईक्षणने 12 वर्षांखालील गटात पहिला क्रमांक मिळवला. या दोघांच्या सरावासाठी रमेश शानभाग यांनी पाटखळ येथे घराजवळ स्पेशल ट्रॅक तयार केला आहे. या दोघांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.