सासवड, (प्रतिनिधी) – आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर, महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड, शाखा व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासन यांच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने मिळालेल्या अर्थसहाय्यातून 26 वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन रविवारी (दि. 11) होणार असल्याची माहिती आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी दिली.
या संमेलनाचे उद्घाटन आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान सासवड येथे होणार आहे. संमेलनाचे उद्घाटक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखक उचल्याकार लक्ष्मण गायकवाड असून स्वागताध्यक्ष जिल्हा मेडिकल असोसिएशन पुण्याचे सदस्य बाळासाहेब भिंताडे आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कृष्णात खोत, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य दिनेश औटी, शामराव पाटील व डॉ. मणीभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन उपस्थित राहणार आहेत. एक दिवसीय होणार्या या साहित्य संमेलनामध्ये कथाकथन, परिसंवाद, बाल आनंद मेळावा, कवी संमेलन व समारोप या कार्यक्रमांचा समावेश आहे.
समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष अॅड. अण्णासाहेब खाडे यांनी दिली. साहित्य संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेचे उपाध्यक्ष बंडूकाका जगताप यांनी केले आहे.