सासवड,(प्रतिनिधी) – पुरंदर तालुक्याचा कारभार हा सासवड शहरातून चालतो. नुकताच पुरंदरच्या तहसील कार्यालयमध्ये पोलीस कस्टडीला लागून असणारी स्ट्रॉग रुम फोडून चोरट्यांनी ईव्हीएम मशीनचे चोरी केली नसल्याची घटना घडली असून यामध्ये पुरंदर तालुक्यातील शासकीय कार्यालयाची सुरक्षा रामभरोसे असल्याची चर्चा सध्या तालुक्यामध्ये रंगत आहे.
पुरंदर तालुक्यातील तहसील कार्यालयमध्ये अनेक गावांचे महसुली रेकॉर्ड त्याचबरोबर कुळ कायद्यांचे खटले यांसह अनेक महत्त्वाचे दस्ताऐवज आहेत. तहसील कार्यालयाच्या आवारात पोलीस व न्यायालयीन कोठडी असल्याने पोलिसांचा तगडा पहारा रात्रीच्या वेळी असतो. मात्र ज्या रात्री चोरी झाली त्या रात्री या ठिकाणचे पोलीस कर्मचारी कर्तव्यावर हजर नव्हते तर संपूर्ण जबाबदारीही एका होमगार्ड वर देण्यात आली होती. चोरी घटना घडत असताना होमगार्डने देखील तिथून पलायन ठोकले असल्याची चर्चात दबक्या आवाजात आहे.
तालुक्यातील तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंचायत समिती, भुमिअभिलेख, कृषी विभाग, नगर रचना विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, यांच्यासह शासकीय कार्यालयामध्ये नागरिकांचे अनेक महत्त्वाचे दस्तऐवज असतात; परंतु नुकत्याच झालेल्या तहसील कार्यालयातील ईव्हीएम मशीनच्या चोरीमुळे दस्तावेज सुरक्षित राहतील का असा प्रश्न विचारला जात आहे. शासकीय कार्यालयांना पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी आता समोर येऊ लागली आहे.
यापूर्वी गुन्हेगारांनी देखील…
तहसील कार्यालयामध्ये असणार्या कस्टडीमधून यापूर्वी देखील अनेक गुन्हेगारांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याच्या घटना घडल्या होत्या त्यातच आता कस्टडी शेजारीच चोरी झाल्याने तर्क वितर्क लढवली जात आहेत. कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे संबंधित कर्मचार्याला निलंबित करण्यात आले आहे.
याची कल्पना होती का नव्हती?
ईव्हीएम मशीन या स्ट्राँग रूममध्ये ठेवल्या संदर्भात पोलिसांना कळविण्यात आले होते की नव्हते यासंदर्भात निवडणूक नायब तहसीलदार संतोष सानप यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही पोलिसांना याची कल्पना होती का नव्हती याबाबत देखील तर्कवितर्क लढवले जात आहेत.