बारामती | सरपंच निवडीला, बाऊंसर आणले दिमतीला

शिरष्णेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी घडला प्रकार; : ग्रामस्थांमधून प्रचंड नाराजी

बारामती (प्रतिनिधी) – बारामती तालुक्‍यातील शिरष्णे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीदरम्यान चक्‍क दहा बाऊंसर आणल्याने परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे. येथे सरपंचपदासाठी रस्सीखेच होती. सकाळी सरपंचपदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेअगोदर तगड्या प्रकृतीचे दहा बाऊंसर्स अचानकच ग्रामपंचायतीबाहेर येऊन थांबल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. हे बाऊंसर नेमके कोणी आणले, याचा खुलासा झाला नसला तरी दहशत निर्माण करणारी असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.

बारामती तालुक्‍यात कोणत्याच निवडणुकीत आतापर्यंत बाऊंसर वापरण्याची प्रथा नव्हती. सरपंचपदाच्या निवडणुकीत ही घटना घडल्याने याची तालुक्‍यात चर्चा झाली. बाऊंसर आल्याचे ग्रामस्थांनी पोलिसांना कळविल्यानंतर काही वेळाने पोलीस त्या ठिकाणी पोहोचल्याचे सांगितले. दरम्यान सरपंचपदाची निवडणूक पूर्वनियोजित होती. काहीसे तणावाचे वातावरण होते, याची माहिती असूनही येथे एकही पोलीस उपस्थित नव्हता. हा पोलिस विभागाचा हलगर्जीपणा असल्याची भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवली.

बारामती तालुका सामाजिकदृष्टया शांतता असलेला तालुका म्हणून प्रसिद्ध आहे, दहशत निर्माण करणारी ही पद्धत पोलिसांनी मोडीत काढायला हवी, अशी ग्रामस्थांची मागणी होती. दरम्यान, ही निवडणूकच दबावाखाली झाल्याचा आरोप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी आक्षेप घेऊन केला. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया रद्द करता येणार नाही, असे कारण देत हा अर्ज निकाली काढला.

पोलिसांचीही अनास्था

बाऊंसर आल्याचे समजल्यानंतर संबंधितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यासह विनामास्कची कारवाई करणे अपेक्षित असताना पोलिसांनीही बघ्याचीच भूमिका घेतली. त्यामुळे ग्रामस्थ संतापले होते. पोलिसांचा धाक राहिलाय की नाही, अशीच स्थिती असल्याचे अनेकांनी सांगितले. पोलीस यंत्रणा सक्षम असेल तर बाऊंसरची गरजच काय, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे. करोनाचे संकट घोंघावत असताना या ठिकाणी असलेले सगळेच बाऊंसर विनामास्क फिरत होते. त्यांच्यावर कोणीही कारवाई करण्यासाठी धजावले नाहीत. शेवटपर्यंत ते विनामास्कच वापरल्याचे फोटोतून पुढे आले आहे.

पोलीस कारवाई करणार

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक सोमनाथ लांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती घेऊन आवश्‍यक ती कायदेशीर कारवाई करीत आहोत, संबंधिताना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले असल्याचे सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.