पुणे – डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठात गेली ७५ वर्षे सुरू असलेल्या संस्कृत शब्दकोश प्रकल्पाचे केंद्र सरकारच्या सहकार्याने पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत डिजिटाझेशन करण्यात आलेली कागदपत्रे, कोशाचे खंड संकेतस्थळाद्वारे येत्या दोन महिन्यांत खुले करण्यात येणार आहेत.
संस्कृत शब्दकोश प्रकल्पासाठी केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, डेक्कन कॉलेज यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे प्रधान सचिव संजय मूर्ती, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद पांडे, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान महासंघाचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे, राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, शब्दकोशाचे प्रधान संपादक डॉ. प्रसाद जोशी या वेळी उपस्थित होते.
मूर्ती म्हणाले, संस्कृत शब्दकोश प्रकल्पाचे काम प्रचंड आहे. पुढील दोन महिन्यात हा कोश सर्वसामान्यांना पाहता येणार आहे. हस्तलिखिते डिजिटल माध्यमात आणली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी अजून खूप काम करावे लागणार आहे. त्यामुळे अन्य विद्यापीठांचे सहकार्य घेतले जाईल. डेक्कन कॉलेज देशभरातील संस्कृत विभागांना त्यासाठी मार्गदर्शन करेल. विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षणासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम निर्माण केला जाईल. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाला या प्रकल्पासाठी मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाचे काम जागतिक पातळीवर नेण्यासाठी आंतरराष्ट्रीय चर्चासत्र घेऊन त्यात हा प्रकल्प सादर केला जाणार आहे.