निघोज – वेताळबाबा स्टेडियम माध्यमातून क्रीडा, व्यायामासाठी एक अद्ययावत स्टेडियम माजी सैनिक व निघोज ग्रामस्थ मुंबईकर मंडळ यांच्या लोकसहभागातून निघोज येथे उभे राहत असून रविवार दि.७ रोजी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्य हस्ते तसेच सरपंच चित्राताई वराळ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 9 वाजता वेताळबाबा स्टेडियम सुशोभीकरणाचे उद्घाटन होणार आहे. युवा व्याख्याते राहुल गिरी यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
निघोजमधील दानशूर व्यक्ती, क्रीडाप्रेमींनी आणि सामान्य नागरिकांनी आपापल्या परीने मदत करत क्रीडांगणाच्या उभारणीला हातभार लावला. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, तरुणांसाठी हक्काचे मैदान नव्हते. मैदानामुळे नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी हक्काचा आधार आता मिळणार आहे. पोलीस भरती, सैन्य भरती यांसाठीही मैदानी चाचणी आवश्यक असते, अशा चाचण्यांची पूर्व तयारी येथे आता सहज शक्य होणार आहे. संपूर्ण क्रीडांगणाला तारेचे कुंपण व शोभेच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. धावण्यासाठी ४०० मीटरची धावपट्टी, मल्लखांब, कबड्डी, खो खो, फुटबॉल, क्रिकेटसह वेगवेगळे खेळ खेळता येतील. रात्री होणाऱ्या सामन्यांसाठी विजेची ही सोय उपलब्ध करण्यात आली आहे. वयोवृद्धांसाठी स्पर्धा आयोजित करून लवकरच विविध सुविधांनी सुसज्ज मैदान नागरिकांसाठी खुले करण्याचा मानस माजी सैनिक संघटना व क्रीडा प्रेमींनी व्यक्त केला.