मुंबई : राज्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही शिंदे गटातील आमदारांवर ते परत ठाकरे गटात जातील अशी टीका केली होती. या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
“जे सत्तेसाठी सरकारमध्ये गेले आहेत ते नाराज राहणार नाहीत असं होणार नाही, ते नाराज राहणारच. कारण त्यांना व्यक्तिगत कितीही दिलं तरी कमीच आहेत.
१५ आमदार जे शिंदे गटात गेले आहेत ते येत्या काळात उद्धव ठाकरेंकडे जाण्याचा प्रयत्न करतील. चर्चा सुरू आहे. फक्त उद्धव ठाकरे त्यांना घेतील की नाही हे पाहावं लागेल”, असे रोहित पवार म्हणाले.
रोहित पवारांच्या या टीकेला संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “रोहित पवारही उद्धव गटाचे प्रवक्ते झाले म्हणजे आश्चर्य आहे. संजय राऊत होते प्रवक्ते, आता हे कशाला होतायत? रोहितजी आपला पक्ष बरा, आपल्याला काय करायचं दुसऱ्या पक्षात काय चाललंय ते”, अशी सूचना वजा टीका त्यांनी केली.