मुंबई – 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत प्रत्येक दिवस प्रेमवीरांसाठी अतिशय स्पेशल असतो. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ला पार्टनरप्रती असलेलं प्रेम व्यक्त केलं जातं. दरम्यान, पशु कल्याण मंडळाने व्हॅलेंटाईन डे ऐवजी 14 फेब्रुवारीला ‘काऊ हग डे’ साजरा करण्याची मागणी केली आहे. 14 फेब्रुवारीला गायींना मिठी मारून त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करावे आणि व्हॅलेंटाईन डे ऐवजी ‘काऊ हग डे’ साजरा करावा, अशी प्राणी कल्याण मंडळाने मागणी केली आहे.
या प्रस्तावावर केंद्र सरकार सकारात्मक विचार करत असताना त्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रेमी युगुलांसाठी हा दिवस खास असून या दिवशी गोमातेवरील आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘काऊ हग डे’ साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना याबाबत विचारणा करण्यात आली असता त्यांनी खोचक शब्दांत मोदींना टोला लगावला आहे. यावेळी संजय राऊतांनी गौतम अदाणींचाही उल्लेख केला.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत ?
“आमची याकडे बघण्याची इच्छाच नाहीये. कारण त्यांची ‘होली काऊ’ म्हणजे अदाणी. अदाणींना ‘हग’ करून ते बसले आहेत. त्याला आम्ही ‘होली काऊ’ म्हणतो. एवढ्या मोठ्या ‘काऊ’ला त्यांनी ‘हग’ केल्यामुळे दुसऱ्या गायींचं या देशात काय राहिलंय? आम्हाला अदाणीला ‘हग’ करता येत नाही, म्हणून आमच्यासाठी त्यांनी गायी सोडल्या आहेत. पण गाय गोमाता आहे, त्या गोमातेचा आम्ही आदर करतो”