मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यं किंवा महत्वाच्या विषयामुळे चर्चेत असतात. मात्र आज संजय राऊत हे त्यांनी केलेल्या रिट्वीटमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेले रिट्विट हे त्यांच्याच सरकारला सवाल केला असल्याचे दिसत आहे. मूळ ट्वीटमध्ये राज्य सरकारने अनलॉकसंदर्भात काढलेली अधिसूचना मराठीत नसून इंग्रजीत का आहे? असा आक्षेप घेण्यात आला आहे.
राज्य सरकाच्या कारभारात सुटसुटीत मराठी असण्यासंदर्भातला मुद्दा या ट्विटमध्ये उपस्थित करण्यात आला आहे. मात्र, हेच ट्वीट संजय राऊत यांनी रीट्वीट केल्यामुळे त्यांनी आपल्याच सरकारला या रीट्वीटच्या माध्यामातून कानपिचक्या दिल्याचे तर्क राजकीय वर्तुळात काढले जात आहेत.
राज्य सरकारने लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यासंदर्भातली नियमावली मध्यरात्री प्रसिद्ध करण्यात आली. ही नियमावली पूर्णपणे इंग्रजी भाषेत आहे. यावरुन सरकारवर टीका करत एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, “सामान्य दुकानदारांनी पाट्या मराठीत लावल्या नाहीत तर त्यांना बडवणार, मराठी मराठी करत मतंही मागणार, पण महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाची सरकारी नियमावली दरवेळी इंग्रजीमध्येच…..संपूर्ण कोरोना काळात हे कायम घडत आलंय….सरकारच्या कामात सुटसुटीत मराठीला प्राधान्य का नाही?”
राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्यावरून झालेल्या मोठ्या गोंधळानंतर राज्य सरकारने अनलॉकचे आदेश जारी केले आहेत. राज्यात सोमवारपासून ५ टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत.