नाशिक – आपल्या खास शब्दांनी विरोधकांना घायाळ करणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा आज एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. सभा असो वा माध्यमांशी बोलणं असो राऊत नेहमीच विरोधकांविरोधात फटकेबाजी करताना दिसून येतात. आज सकाळी मात्र थेट क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी करणारे संजय राऊत सर्वांना पाहायला मिळाले.
पत्राचाळ प्रकरणात जामीन मंजूर झाल्यानंतर संजय राऊत यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. नाशिकपासून त्यांनी हा दौरा सुरु केलाय. नवीन नाशिक येथील संभाजी स्टेडियमवर क्रिकेट सामन्याचे उदघाटन राऊत यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी मैदानावर उतरवून थेट बॅटिंग करण्याचा आंनद घेतला. बॅटनेदेखील राऊत यांनी यावेळी चांगलीच फटकेबाजी केल्याचे दिसून आले.
नाशिक दौऱ्यावर संजय राऊत हे अनेक पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती देखील घेणार आहेत. तसेच सिन्नर आणि मनमाड या ठिकाणांनाही राऊत भेट देणार आहेत. राऊत यांच्या दौऱ्यासाठी शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली आहे. आगामी निवडणुका आणि पक्ष बांधणीच्या दृष्टीने संजय राऊत यांचा हा दौरा महत्वाचा असणार आहे.