नवी दिल्ली – श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. 26 वर्षीय श्रद्धाचा निर्घृण पद्धतीने हत्या करणाऱ्या आफताब विरोधात सर्वांकडूनच रोष व्यक्त केला जात असून, या घटनेमध्ये रोज नवीन धक्कादायक खुलासे होत असल्याचं दिसून येत आहे. नुकतंच आफताबची पॉलीग्राफ चाचणी झाल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात नेण्यात आलं आहे. सध्या तो तिहार जेल मध्ये आहे.
दरम्यान, काल आफताब पुनावाला याची नार्को टेस्ट करण्यात आली, ज्यामध्ये त्याने 50 प्रश्नांची उत्तरे दिली असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या पोलिसांकडून आफताबची कसून चौकशी करण्यात येत आहे. काल झालेल्या नार्को टेस्टचा सविस्तर अहवाल एफएसएल पथकाने पोलिसांकडे सोपवला आहे. मात्र, आज आफताबची ‘पोस्ट नार्को टेस्ट’ केली जाणार असून, जी तिहार जेलमध्येच केली जाईल. यामध्ये आरोपीला अनेक प्रश्नांचा सामना करावाला लागणार आहे.
दरम्यान, आफताबच्या पोस्ट नार्को टेस्टसाठी एफएसएलने 4 सदस्यांची टीम तयार केली असून, ही टीम आज चौकशी करणार आहे. पॉलीग्राफ आणि नार्को टेस्ट प्रमाणेच पोस्ट नार्को टेस्टमध्ये प्रश्नोत्तरे केली जाणार आहे. मात्र, या टेस्टला कालावधी जास्ती प्रमाणात लागत असून, पोलीस अधिकार सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतात.
पोलिसांच्या माहितीनुसार, आफताबसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणारी श्रद्धा वालकर त्याच्यासोबत ब्रेकअप करणारी होती. मात्र, तिच्या या निर्णयाने संतापलेल्या आफताबने तिची हत्या केली असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले. ‘लिव्ह-इन’मध्ये राहणाऱ्या आफताब आणि श्रद्धामध्ये लहान गोष्टींवरून वाद होत असे.
आफताबचे वागणं आणि त्याच्याकडून होणारी मारहाण याला श्रद्धा कंटाळली होती. त्यामुळे तिने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता. श्रद्धाने 3-4 मे रोजी आफताबपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. तिचा हा निर्णय आफताबला पटला नाही. त्यामुळे तो प्रचंड संतापला होता. आणि याच संतापातून त्यांनी तिची हत्या केल्याचं म्हंटलं आहे.