मुंबई : मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्यांवरुन भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात कलगीतुरा रागांत असल्याचे पाहायला मिळत आहे. आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात किरीट सोमय्या आणि त्यांचे पूत्र नील सोमय्या यांचा पाय खोलत दिसत असून न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर ट्विट करत संजय राऊत यांनी बाप बेटे तुरुंगात जाणार असल्याचा पुनरुच्चार केला. सोमय्या बाप बेटे तुरुंगात जाणार, अनिल देशमुख, आणि नवाब मलिक यांच्या कोठडीशेजारी सोमय्या राहणार, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.
खुद्द संजय राऊत यांनीच आयएनएस विक्रांत युद्धनौकेत गैरव्यवहार केल्याचे आरोप किरीट सोमय्या यांच्यावर केले होते. राऊतांच्या आरोपानंतर सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. आज मुंबई सत्र न्यायालयात याप्रकरणी सुनावली झाली. या सुनावणीवेळी किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.