मुंबई – सिनेमॅटोग्राफर म्हणून करिअरचा श्रीगणेशा करणारे ‘संजय जाधव’ आता मराठी चित्रपटसृष्टीत नावाजलेले दिग्दर्शक म्हणून परिचित आहेत. आतापर्यंत संजय जाधव यांचे ‘दुनियादारी’, ‘खारी बिस्कीट’, ‘लकी’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’ असे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.
आता पहिल्यांदाच संजय जाधव ऐतिहासिक चित्रपटाचे छायांकन करणार आहे. “रावरंभा’ असं या आगामी चित्रपटाचं नाव असणार असून, नुकतंच कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला.
अनुप जगदाळे दिग्दर्शित “रावरंभा’ या चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी संजय जाधव निभावणार आहे. तर, या चित्रपटाची निर्मिती शशिकांत शीला भाऊसाहेब पवार करत आहेत.
इतिहासाच्या पानांमध्ये रावरंभा ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही दडली आहे. ही प्रेमकहाणीच रावरंभा या चित्रपटातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर येत आहे. सातारा जिल्ह्यात चित्रित होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे.