लंडन- त्या काही वर्षांमध्ये जगात सर्वत्रच वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढले असून त्याचा तडाखा जगातील दोनशे पन्नास कोटी पेक्षा जास्त लोकसंख्येला बसला आहे वायू प्रदूषणाची तीव्रता वाढल्याने मृत्यूचे प्रमाणही वाढले असून लहान मुलांमध्ये अस्थमा हा आजारही वाढला आहे.
लॅन्सेट या वैद्यकीय संशोधन विषयक माहिती प्रसिद्ध करणाऱ्या जर्नलमध्ये याबाबत लेख प्रसिद्ध झाला आहे. 2019 या एकट्या वर्षांमध्ये जगभरात सर्वत्र वायुप्रदूषणामुळे तब्बल 18 लाख लोकांचा मृत्यू झाला असे या लेखात म्हटले आहे. याच एका वर्षात जगात सर्वत्र वीस लाख लाख पेक्षा जास्त लहान मुलांना अस्थमा हा विकार जडला असेही या लेखात म्हटले आहे.
जगातील 55 टक्के लोकसंख्या शहरी भागात रहात असल्यामुळे आणि शहरी भागात वायू प्रदूषण जास्त असल्यामुळे त्याचा मोठा फटका बहुतांश लोकसंख्येला बसला आहे. एका संशोधनावर आधारित हा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. या वैज्ञानिकांनी जगातील 13 हजारपेक्षा जास्त शहरांचा अभ्यास करून हा लेख प्रसिद्ध केला आहे. वायुप्रदूषणाची तीव्रता वाढल्यामुळे लोकांना श्वास घेण्याची समस्याही उद्भवू लागली असल्याचे या संशोधकांनी म्हटले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये वायू प्रदूषणाची तीव्रता वाढली असून तेथील मृत्यु प्रमाणही 30 ते 40 टक्क्यांनी वाढले आहे. वायूप्रदूषणामुळे हवेतील नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत असल्याने त्याचा परिणाम म्हणून लहान मुलांमध्ये अस्थमा या रोगाचे प्रमाणही वाढत चालले असल्याचे या लेखात म्हटले आहे.