हैदराबाद – करोनाच्या संकटामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळलेली असताना सोशल मीडियावर विविध पाककृतींचे व्हिडिओ पोस्ट करताना लाज कशी वाटत नाही, असा संतप्त सवाल टेनिसपटू सानिया मिर्झा हिने नेटकऱ्यांना केला आहे.
इथे देशातील रोजंदारीवरील कर्मचारी देन वेळच्या जेवणाचा बंदोबस्त करण्यासाठी जीवाचे रान करत आहेत आणि देशातील अनेक महिला व पुरुष आपण घरी केलेल्या पाककृतींचे व्हिडिओ पोस्ट करत आहेत.
करोनामुळे हाताला काम नसल्याने अशा कामगारांसमोर दोन वेळच्या जोवणाचीही भ्रांत निर्माण झाली आहे. गरीब व रोजंदारीवर काम करणारे रस्त्यावर आले आहेत. अशा वेळी त्यांच्यासाठी मदत करायला पुढे येण्याऐवजी पाककृतीचे व्हिडिओ पोस्ट करताना जनाची नाही तर मनाची लाज कशी वाटत नाही, अशी विचारणा सानियाने केली आहे.
सानियाने अशा मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी मोठा निधी देत पुढाकार घेतला आहे. तिच्यासह विविध सेवाभावी संस्था आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती दररोज मदतीसाठी हात पुढे करत आहेत.
सानियाने रोजंदारीवरील कामगारांना जेवण आणि मूलभूत गरजेच्या वस्तू पुरवण्याचा सपाटा लावला आहे. या लोकांची काळजी घेणे आपली केवळ जबाबदारी नसून कर्तव्य आहे. असे असतानाही काही संपन्न लोकांना दुसऱ्याला मानसिक त्रास देण्याची दुर्बुद्धी कशी सुचते असेही तिने विचारले आहे.