पुणे : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस प्रशासन, राज्य प्रशासन अखंडपणे कार्यरत आहे. कारागृहात देखील कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या कैद्यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र, यापुढील काळात मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह आणि कल्याण जिल्हा कारागृह लॉकडाऊन करण्यात येणार आहेत. असा आदेश राज्याचे कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी राज्यातील कारागृह प्रशासनाला दिले आहेत.
लॉकडाऊनच्या वेळी कारागृहात कमीत कमी अधिकारी असतील याची काळजी तुरूंग अधीक्षक यांनी घ्यावी. तसेच या काळात कारागृहाचे सर्व दरवाजे अधीक्षकांच्या स्वाक्षरीने बंद करण्यात येणार आहेत. याशिवाय एका महिन्याकरिता पुरेल एवढी साधनसामग्री कारागृहात उपलब्ध आहे; याची खात्री करण्यात यावी, अशा सूचना अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत.