नंदीला विचारताहेत प्रश्न : याबाबत नंदीला ट्रेनिंग नाही – नंदीवाले
बेल्हे – “सांग सांग भोलानाथ, पाऊस जाईल का’? असे म्हणण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांवर आली आहे.
यंदा राज्याच्या सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पिकाचे नुकसान झालं आहे. त्यामुळे यंदा “सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का, असे म्हणण्याची वेळ न येता “सांग सांग भोलानाथ पाऊस जाईल का’, असे म्हणण्याची वेळ आलेली आहे.
नंदीवाले सध्या दारोदारी जात असून लोक त्यांना “भोलानाथ पाऊस जाईल का? असा प्रश्न विचारताना दिसत आहेत; परंतु या प्रश्नाचा सराव नंदीला नसल्याने त्याचे उत्तर काही नंदीला देता येत नाही. अनेक वर्षातून यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नंदीला सुद्धा यंदाचा पाऊस कधी जाईल याचा संभ्रम निर्माण झाली आहे.
आम्ही पिढ्यान् पिढ्या हा व्यवसाय करतो; परंतु यापूर्वी असा अनुभव आला नाही; परंतु यंदा जो तो नंदीला पाऊस कधी जाईल असा प्रश्न विचारत आहेत.
– सदाशिव फुलमाळी, नंदीवाले, आळेफाटा