उपसरपंच पदासाठी सदस्याचा नकार
भिगवण भिगवण ग्रामपंचायतीचे उपसरपंच रिक्त होत असलेल्या उपरपंचपदाला ग्रामपंचायत सदस्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच नकार दिल्याने ग्रामपंचायत सदस्यांमध्ये संदोपसुंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दिवसांपासून सदस्यांना सरपंच आणि उपसरपंचपदाचे गाजर दाखवून झुलवत ठेवल्याने आता याचा फटका सत्ता असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला बसणार आहे. भिगवण ग्रामपंचायतीवर 20 वर्षे अबाधितपणे सत्ता मिळविणाऱ्या कॉंग्रेसचे पानिपत करून 17 पैकी 13 सदस्यासह सत्तेत आलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्यातपदासाठी रस्सीखेच सुरू असतानाच पक्षाशी प्रामाणिक राहून योग्यवेळी आपणाला पदासाठी प्राधान्य देण्यात आले नसल्यामुळे तुषार क्षीरसागर यांनी नाराजी व्यक्त करीत स्वत:ला देण्यात येत असलेल्या उपसरपंचपदासाठी स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे.
ग्रामपंचायतीच्या कारभारात आपणाला विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार त्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सहा महिन्याच्या पदाच्या काळात काय विकासकाम होवू शकते, असा सवाल उपस्थित केला आहे. नवीन नियमावलीनुसार आगामी सरपंच हा जनतेतून निवडला जाणार असल्याने भविष्यात सरपंचपद मिळेल न मिळेल आता 6 महिने तरी आपल्या नावाची पाटी लागावी, यासाठी रस्सीखेच सुरू आहे. पद नको, असे वरिष्ठांना निरोप दिल्याने नागरिकांत चर्चेला उधाण आल्याचे दिसून येत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरच रंगलेल्या नाराजीचा फटका कोणाला बसेल, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.