डिकसळमध्ये प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी
भिगवण- डिकसळ (ता. इंदापूर) येथे काही लोकांच्या गैरकृत्यांमुळे गावची बदनामी होत आहे. याला आळा घालण्यासाठी ग्रामसभा घेवून गावामध्ये होत असलेल्या गैरकृत्यांचा निषेध नोंदवून समाजाकडून गावात व विकासकामांसाठी असलेल्या मोकळ्या जागेत अतिक्रमण करून विकासकामांना अडथळा निर्माण केला असल्याने हे अतिक्रमण काढून टाकण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
डिकसळ गावामध्ये अतिक्रमणधारकांना ग्रामपंचायतीकडून नोटीस काढल्यानंतर गावातील पदाधिकाऱ्यावर तक्रार करून ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्याचा प्रकार सुरू आहे. या लोकांकडून गावामध्ये दिवसाढवळ्या राजरोसपणे अश्लील कृत्य करून देहविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. संबंधित लोकांचे गावात येणे- जाणे सुरू झाले आहे. गावाची ओळख बदनामकारक झाल्याने पदाधिकारी त्यांना समजावून सांगण्यास गेल्यास खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. अनेक दिवसांपासून होत असलेल्या या लोकांकडून गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना धकमी देऊन खंडणी वसूल करण्याचा प्रकार सुरू झाला असल्याने डिकसळ गावातील महिला आणि पुरुषांना याचा नाहक त्रास होत असल्याने गाव सोडण्याची वेळ ग्रामस्थांवर आली असल्याने सदरच्या बाबी ग्रामसभेत घेवून ठराव करत याचा प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
वरील प्रकारांमुळे डिकसळ गावामध्ये तणाव निर्माण झाला असून मोठा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता ग्रामसभेत वर्तविली आहे. त्यामुळे सदरच्या समाजाची गावाबाहेर पर्यायी व्यवस्था करावी किंवा संपूर्ण गावाची पर्यायी व्यवस्था करावी अशी विनंती ग्रामस्थांकडून प्रशासनाला केली गेली आहे..
फोटो ओळ : डिकसळ (ता. इंदापूर) ग्रामंपचायतीच्या ग्रामसभेला उपस्थित असलेले ग्रामस्थ.