नवी दिल्ली – हाय-प्रोफाइल लोकांना 200 कोटींपेक्षा जास्त रक्कमेचा गंडा घालणारा आणि बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींना कोट्यवधी रूपयांचे गिफ्ट देऊन प्रकाशझोतात आलेला सुकेश चंद्रशेखर याने सध्या सर्वांचीच झोप उडवली आहे. सध्या सुकेश चंद्रशेखकर याला दिल्लीच्या मंडोली कारागृहात ठेवण्यात आलं असून, तुरुंगात देखील तो सर्व सुखसुविधा उपभोगत असल्याचं दिसून आलं आहे. नुकतंच सुकेश चंद्रशेखर याच्या कोठडीतील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यामध्ये सुकेश चंद्रशेखर याच्या जेलमधील खोलीत महागड्या वस्तू असल्याचं दिसत आहेत.
बुधवारी (दि. 22) सुकेश चंद्रशेखर याच्या मंडोली कारागृहात असलेल्या खोलीवर अचानक धाड टाकण्यात आली होती. यावेळी अधिकाऱ्यांनी सुकेश याच्याकडून अनेक महागड्या वस्तू आणि रोख रक्कम जप्त केल्या आहेत. यामध्ये गुच्ची सारख्या नामांकित ब्रॅण्डची चप्पल आणि 80 हजार रुपये किमतीच्या दोन जीन्स तसेच, 1.5 लाख रूपये रोख रकमेचा समावेश असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, समोर आलेल्या या सीसीटीव्ही फुटेजवर आणि हे फुटेज लीक करणाऱ्या व्यक्तीवर लवकरच कारवाई करून त्याची सविस्तर चौकशी करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मात्र, जेव्हा पोलीस अधिकारी सुकेश चंद्रशेखर याच्या कोठडीत गेले तेव्हा तो रडत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. सुकेशला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉंड्रिंगच्या एका नवीन प्रकरणात नुकतीच अटक केली आहे.
#WATCH | Luxury items found in conman Sukesh Chandrasekhar’s jail cell. CCTV visuals from Mandoli jail shared by sources show Sukesh after raids caught items in his jail cell.
(Source: Mandoli Jail Administration) pic.twitter.com/Fr77ZAsGbF
— ANI (@ANI) February 23, 2023
वयाच्या 17 व्या वर्षांपासून गुन्हेगारी जगतात प्रवेश केलेल्या सुकेशने आतापर्यंत 100 पेक्षा जास्त श्रीमंतांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या श्रीमंताना तो हेरायचा. त्यांचा अभ्यास करायचा अन नंतर अधिकारी म्हणून त्यांच्याशी संपर्क साधायचा. उत्तम संभाषण कौशल्य असल्यामुळे समोरच्या प्रभावित करून तो मदत देउ करायचा आणि आपले इप्सित साधायचा अशी त्याची कार्यपध्दती होती.