परिंचे (वार्ताहर) – श्री क्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे म्हस्कोबांच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत समीर शेखने (हनुमान आखाडा, पुणे) सोनु सोनटक्के (मुरगुड साई आखाडा, कोल्हापूर) याचा पराभव करीत श्रीनाथ केसरीची मानाची गदा व 51 हजार रुपयांचे बक्षीस पटकावले.
श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट आणि कुस्ती संयोजन समिती, वीर यांच्या संयुक्त विद्यमाने कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. दुसर्या क्रमांकाची कुस्ती विनायक वाल्हेकर व रामा धायगुडे यांच्यात झाली असून ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.
ब्रह्मा बुरंगले व प्रवीण शेलार, प्रतीक सोनवणे व केशव लोंढे यांच्या कुस्त्या प्रेक्षणीय झाल्या विजयी मल्लांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ, विश्वस्त खजिनदार अमोल धुमाळ, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप धुमाळ, बाळासाहेब धुमाळ, विश्वस्त मंडळ व मान्यवरांच्या हस्ते समीर शेखला सन्मानित करण्यात आले.
कुस्ती आखाड्यात दिल्ली, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील तीनशे मल्लांनी सहभाग घेतला होता. पंच म्हणून वीर गावचे पैलवान संग्राम धुमाळ, पै. दिगंबर धुमाळ, पै. लक्ष्मण जाधव, यांनी काम केले.
कुस्ती आखाड्याचे समालोचक पै. अनिकेत कदम (फलटण) यांनी केले. संजय आवळे (कोल्हापूर) यांच्या हलगी पथकाने आखाड्याला शोभा आणली अमर धुमाळ, रुपेश धुमाळ, मंगेश धुमाळ,सुरज धुमाळ तसेच कुस्ती नियोजन समितीच्या वतीने या कुस्ती आखाड्याचे नियोजन करण्यात आले होते.