जालना – साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झालेला असताना जालन्यातही एका अवघ्या 13 वर्षांच्या वैष्णवी साळूंके नावाच्या मुलीने कुस्तीचे मैदान गाजवले आहे. एक हजार रुपयांसाठी लावलेली ही कुस्ती वैष्णवीने अवघ्या 15-20 मिनिटांत प्रतिस्पर्धी व आव्हान दिलेल्या कुस्तीपटू असलेल्या मुलाला तीने आस्मान दाखवले व चीतपट करत ही कुस्ती जिंकली.
जालन्यातील मौजपुरी येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यात वैष्णवी या 13 वर्षाच्या मुलीने कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात फेरी मारताना उपस्थित मल्लांना आव्हान दिले. हे आव्हान एका मुलाने स्वीकारले व या दोघांत सामना झाला.
वैष्णवीने या प्रतिस्पर्धकाला चितपट करुन कुस्तीचा आखाडा गाजवला आणि 1 हजार रुपयाचे बक्षिसही जिंकले. वैष्णवी मंठा तालुक्यातील वरुड येथील रहिवासी आहे. मंठा तालुक्यातील वैद्य वडगाव येथील लाल बहादुर शास्त्री विद्यालयात ती आठव्या वर्षात शिक्षण घेत असलेली वैष्णवी महिला कुस्तीपटू म्हणून नावारुपाला येण्याचा प्रयत्न करत आहे.