पुणे -बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट आयोजित अखिल भारतीय खुल्या फिडे क्लासिकल रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याच्या फिडे मास्टर आदित्य सामंत याने 8 गुणांसह आघाडी कायम राखत विजेतेपद संपादन केले.
अश्वमेध हॉल, पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धेत नवव्या फेरीत पुण्याच्या फिडे मास्टर आदित्य सामंतने रेल्वेच्या विक्रमादित्य कुलकर्णीला 80 चालींमध्ये बरोबरीत रोखले व 8 गुणांसह विजेतेपदाला गवसणी घातली. 15 वर्षीय आदित्य हा अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम शाळेत 10 वी इयत्तेत शिकत आहे. त्याचे या वर्षातील हे दुसरे विजेतेपद असून त्याने यादी नुकत्याच पुण्यात पार पडलेल्या खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. तर, फिडे मास्टर सौरव खेर्डेकरने दुसरा तर, रेल्वेच्या विक्रमादित्य कुलकर्णीने तिसरा क्रमांक पटकावला. गुजरातच्या अनादकत कर्तव्या व महाराष्ट्राच्या अक्षय बोरगावकर यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्या आदित्य सामंतला करंडक व 50 हजार रुपये, तर उपविजेत्या सौरव खेर्डेकरला करंडक व 30 हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांक पटकावणाऱ्या विक्रमादित्य कुलकर्णीला करंडक व 20 हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण एचटूइ पावर सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ मयूर, कोल्हापूर बुद्धिबळ संघटनेचे माजी सचिव व बॅंक ऑफ महाराष्ट्राचे निवृत्त डीजीएम अनिल राजे, पीडीसीसीचे सहसचिव शेखर जोरी, पीडीसीसीचे सदस्य चंद्रकांत मोकाशी, पीडीसीसीचे सचिव डॉ. संजय करवडे, यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे, चीफ आरबीटर नितीन शेणवी आदी मान्यवर उपस्थित होते. विनिता श्रोत्री यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.