कंपाला – आफ्रिकन देश युगांडा साखळी बाॅम्बस्फोटाने हादरले आहे. युगांडाची राजधानी कंपालामध्ये संसद भवनाजवळ बाॅम्बस्फोट झाला असून या घटनेत दोन जण ठार झाले आहेत. घटनेवेळी भारतीय पॅरा बॅडमिंटन संघ स्फोटाच्या ठिकाणापासून केवळ 100 मीटर अंतरावर होता. मात्र, या स्फोटात भारतीय संघाचे कोणतेही नुकसान झाले नाही. भारतीय पॅरा बॅडमिंटन संघ काही दिवसांपूर्वीच पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल-2021 मध्ये सहभागी होण्यासाठी युगांडा येथे पोहोचला आहे. या संघात टोकियो पॅरालिम्पिक-2021 मधील पदक विजेते प्रमोद भगत, मनोज सरकार आणि इतर खेळाडूंचा समावेश आहे.
– इमारतीला लक्ष्य करून बाॅम्बस्फोट
स्थानिक वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, यातील एक स्फोट पोलीस ठाण्याजवळ झाला आणि दुसरा स्फोट संसद भवनाजवळ रस्त्याच्या कडेला झाला. संसदेजवळील स्फोट हा विमा कंपनीचे कार्यालय असलेल्या इमारतीला लक्ष्य करून करण्यात आला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. स्फोटामुळे तेथे उभ्या असलेल्या वाहनांना आग लागली होती.
– सातत्याने होत आहेत स्फोट
दरम्यान, 23 ऑक्टोबर रोजी कंपाला येथील रेस्टॉरंटमध्येही बाॅम्बस्फोट झाला होता. यावेळी एकाचा मृत्यू तर सात जण जखमी झाले होते. मध्य आफ्रिकेतील इस्लामिक स्टेट गटाशी संलग्न असलेल्या अलायड डेमोक्रॅटिक फोर्सेसने रेस्टॉरंटवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर 23 ऑक्टोबर रोजीच्या बॉम्बस्फोटानंतर दोन दिवसांनी प्रवासी बसमध्ये स्फोट झाला होता. या घटनेत एक आत्मघाती हल्लेखोर ठार झाला होता.