बिवेवाडी (हर्षद कटारिया)- तळजाई वसाहत येथे लुकंड ट्रस्ट शाळेशेजारील वसाहतीत महापालिकेने उभारलेल्या समाज मंदिरावर अनधिकृत मोबाइल टॉवर उभारून खासगी व्यक्तीकडूनच भाडे लाटले जात असल्याचा प्रकार “प्रभात’ने उघडकीस आणल्यानंतर महापालिका प्रशासनाने कारवाई करीत हा टॉवर अखेर काढला आहे.
समाज मंदिरावर उभारण्यात आलेला मोबाइल टॉवर काढण्यात आला असून “प्रभात’च्या पाठपुराव्यानंतर महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.
या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करून भाडे घेणाऱ्या संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्याबाबतही प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. संबंधित मोबाइल कंपनीकडून माहिती घेतली जात असून कागदपत्रांच्या आधारावर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
तळजाई वसाहतीतील अनधिकृत मोबाइल टॉवरबाबत वृत्त प्रसिद्ध होताच, शहर-उपनगरांतील अनेकांनी “प्रभात’शी संपर्क साधून अन्य अनधिकृत टॉवरची माहिती दिली आहे. सदर, माहिती महापालिका प्रशासनाकडे देण्यात आली असून सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून संबंधीत ठिकाणी पाहणी करून चौकशीअंत कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
शहरात महानगरपालिकेच्या इतर मिळकतींवर असे अनधिकृत मोबाइल टॉवर उभारण्यात आलले आहेत का, याबाबत क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याबाबत माहिती मिळताच पुढील कारवाई करण्यात येईल.
– ज्ञानेश्वर मोळक,
महापालिका अतिरिक्त आयुक्त (विशेष)
टॉवर काढले असले तरी सदर टॉवर ज्या नगरसेवकच्या संमतीने त्याचा वैयक्तिक स्वरूपात फायदा करून घेण्यासाठी बांधण्यात आले असेल त्या संबंधित बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या सर्व व्यक्तींवर कायदेशीर मार्गाने तातडीने फौजदारी गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे.
– सुभाष जगताप,
नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
“प्रभात’ने केलेल्या पाठपुराव्यास यश आले. परंतु, मोबाइल टॉवर जरी काढण्यात आला असला तरी तो कोणी उभारला होता? याचे भाडे घेत कोण होते? याच्याशी संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केली आहे. – निखिल शिंदे,
अध्यक्ष, नमस्कार प्रतिष्ठान